कर्नाटक देशातील "अंजन " नामक गावी ऋषी शापामुळे एक अंध व एक मूक असे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. यांना ऋषींनी शाप दिला होता, त्या शापातून मुक्त होण्यासाठी काही योग्यांनी त्यांना ज्वाला नृसिंह तीर्थावर जाऊन साधना व ताप करा असा सात्विक सल्ला दिला. त्या प्रमाणे ते दाम्पत्य मार्ग शोधात,
ठिकाणाचा वेध घेत या ज्वाला नृसिंह तीर्थावर पोहोचले. त्या ठिकाणी त्या दाम्पत्याने सदाचार वृत्तीने बारा वर्ष व्रतस्थ राहून तपश्चर्या केली. त्या वेळी त्यांना
स्वप्नी असा दृष्टांत झाला कि " मी या जल डोहात आहे, भीम राजास माझी आज्ञा म्हणून सांग कि मला पाण्यातून वर काढून माझी सिद्ध भूमीवर स्थापना कर ".
हे स्वप्न दर्शन व हा स्पष्ट आदेश ऐकून त्या ब्राह्मणाने देवांना स्वप्नातच शंका प्रकट केली कि."हे प्रभो हा डोह विस्तीर्ण आहे तरी या डोहात आपले नेमके अस्तित्व आम्हा अज्ञास कसे समजेल ?".
त्यावर श्री प्रभूंनी उत्तर दिले. शोध घेताना शुष्क काष्ठ पाण्यात, मार्गात टाकत जा, ते काष्ठ ज्या ठिकाणी आपोआप प्रज्वलित होईल त्या ठिकाणी मी आहे असे समज. हि हकीकत त्या दाम्पत्यांनी कुंडीनपूरला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या राजा भिमदेवास श्रद्धेने कथन केले.
या स्वप्नीच्या हकीकतीवर त्या स श्रद्ध राजाने शोध घेण्याचे ठरवून त्या तयारीने आपले सैन्य, साधन सामुग्री निशी कृष्णा काठी येऊन हजर झाला.
डोहाच्या दक्षिण व पूर्व या दिशेपासून म्हणजे ज्या ठिकाणापासून डोह सुरु होतो तेथे अनेक होड्या व नावा सोडल्या. होड्यांचा पाठीमागे सुश्क काष्ठानि युक्त असे तूरकाटयाची पेंडी दोरीने प्रत्येक नावेला बांधून पाण्यात तरंगती ठेवली. अशा रीतीने शोध चालू असता एका विशिष्ठ ठिकाणी पेंडीने अचानक पेट घेतला, खुण खुणेला पटली स्वप्न सत्यात आले.
सर्वांनी मिळून जड अशी मूर्ती वर काढून नदी किनारी एका मोठ्या अश्वथाच्या वृक्षा खाली ठेवली, हि दिव्य व स्वयंभू मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला.
राजाला हि मूर्ती आपल्या राजधानीत नेण्याची इच्छा होती, पण नरसिंहने त्याला सांगितले कि, तुझ्यावर माझी कृपा आहे, पण मला येथून दुसरी कडे नेण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे हे स्थान प्रिय आहे. ते स्थान म्हणजे सध्याचे कोळे नरसिंहपूर होय.
No comments:
Post a Comment